आज 24 वर्षे आम्ही सतत संघर्ष करत आहोत म्हणून काही मिळायला लागले. आम्ही संघर्ष केलाच नसता तर हे सगळं मिळू शकलं असतं का? अर्थात उत्तर नाहीच मिळणार. कारण प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला सारून ‘उटा’ ह्या संस्थेच्या जेंड्याखाली एकत्र येणं हांच एक पर्याय आपल्याला आहे.
युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन्स अलायन्स अर्थात ‘उटा’ ह्या संस्थेचा जन्म 6 ऑक्टोबर 2004 रोजी झाला.
या वर्षी म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 रोजी आमची ‘उटा’ ही संस्था आपल्या वयाची आणि आपल्या संघर्षाची वीस वर्षे पूर्ण करीत आहे, याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. हा वीस वर्षांचा म्हणजे द्विदशक सोहळा 6 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी अभियांत्रिकी कॉलेज फर्मागुडी यांच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने होणार आहे. त्यानिमित्त उटाच्या संघर्ष, उटाची चळवळ, उटाने या वीस वर्षात काय केले आणि काय मिळवलं याचा एक आढावा आपल्यापुढे येणं गरजेचं आहे, अस आम्हांला वाटतं. त्यासाठी हा लेखप्रपंच.
7 जानेवारी 2003 साली गोमंतकीय अनुसूचित जमातीने म्हणजेच गावडा, कुणबी आणि वेळीप ह्या तीन जमातींना अ. ज. दर्जा देण्यात आला. म्हणजेच घटनेप्र्रमाणे आमच्या या तीन जमातींना शेड्युल्ड ट्रायबलचा दर्जा देण्यात आला. पण हा दर्जा काही सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी आमच्या कित्येक नेत्यांनी अथक परिश्रम केले. गावोगावी बैठका घेतल्या, जागृती केली. अधिवेशने भरवली. पण सरकार काही कानांमनावर घेईना. त्यामुळेच स्वर्गीय आंतोन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. बाबुसो गावकर, डॉ. काशिनाथ जल्मी यासारखे नेते एका व्यासपीठावर जमले आणि सरकारला गंभीर इशारा देण्यात आला. तेव्हा केंद्रात आणि राज्यातही भाजप सरकारच होते. त्याचबरोबर इतर 26 जमातींचा अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आता सर्व काही आम्हांला आपोआप मिळणार, आमचा उद्धार होणार, आमचा भरघोस विकास होणार या आशेवर आम्ही होतो.
पण सरकारची चालबाज खेळी आम्ही ओळखून होतो. सरकारे कुणाचीही असो, काँग्रेस, एम.जी.पी. वा भाजपा कुणालाही तसा या जमातींचा पुळका नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. गोमंतक गौड मराठा समाज संघटनेत 2001 साली माझी जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाल्यापासून मला वाटत होते की, आम्ही फक्त गोमंतक गौड मराठा समाज म्हणून एकटे पुढे जाऊ शकत नाही, तर आम्ही ही चळवळ
एस. टी. म्हणून पुढे नेली पाहिजे. त्यांनासुद्धा बरोबर घेऊन आम्ही पुढचा लढा दिला पाहिजे. गोमंतक गौड मराठा समाजाचे त्यावेळचे अध्यक्ष स्वर्गीय यशवंत गावडे हे बुजुर्ग होते. दूरदृष्टीचे होते. वय झालेले असले तरी ते आमच्या बरोबर, तसेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यांच्याच पुढाकाराने त्यावेळी गोव्यात काम करीत असलेल्या आठ एस. टी. संघटनांना एकत्र आणून युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन्स अलायन्स (उटा) ही संस्था स्थापन करण्यात आली. उटाच्या स्थापनेत ज्या संस्था आणि संस्थेच्या अध्यक्षांनी जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले त्या संस्था व त्यांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे :
1) गोमंतक गौड मराठा समाज – अध्यक्ष – श्री. यशवंत गावडे, 2) ट्रायबल वेल्फेअर असोसिएशन – अध्यक्ष – डॉ. काशिनाथ जल्मी, 3) गावडा, कुणबी, वेळीप, धनगर फेडरेशन – अध्यक्ष – श्री. आनंद गावडे, 4) ऑल गोवा शेड्युल ट्रायबल्स युनियन – अध्यक्ष श्री. नामदेव फातर्पेकर, 5) ट्रायबल्स ऑफ गोवा – अध्यक्ष – श्री. पिटर गामा, 6) गोमंतक वेळीप समाज संघ – अध्यक्ष – श्री. प्रकाश शंकर वेळीप, 7) तालिगांव ट्रायबल वेल्फेअर – अध्यक्ष – श्री. नारायण कुट्टीकर,
9) ट्रायबल हितचिंतक – प्रमुख – फादर जोकीम.
या सर्व संस्था एकत्र आल्या. उटा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माजी मंत्री श्री. प्रकाश शंकर वेळीप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर विशेष सचिव म्हणून डॉ. उदय गावकर यांची निवड करण्यात आली. श्री. आंतोनियो फ्रांन्सीस फर्नांडीस यांची निमंत्रकपदी तर सर्व संस्थांचे इतर अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. (संपूर्ण कार्यकारिणी आणि इतर माहिती डॉ. उदय गावकर यांच्या ‘उटा संघर्ष’ या पुस्तकात उपलब्ध आहे.)
या सर्व संस्था एकत्र आल्याने आम्हाला नवा हुरूप आला. गावडा कुणबी वेळीप या तीन जमातींना अनुसूचित जमातींचा दर्जा मिळाला. पण यात नव हिंदू गावडा, कॅथलीक गावडा यांचाही समावेश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आमची नवी ओळख ‘एस. टी.’ घोषित केली आणि कामाला लागलो. आम्हांला काय मिळवायचं आहे. कुठल्या दिशेने जायचं आहे. काय करायचं आहे. हे पक्कं ठरवण्यात आलं आणि काम सुरू झालं. आम्ही आमच्या निवडक बारा मागण्या घेऊन पुढे सरसावलो, गावोगावी जाऊन जनजागृती केली. मामलेदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने केली. त्यांना निवेदने दिली. तालुका मेळावे घेतले, राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. गोव्यातल्या चाळीसही आमदारांना त्यांच्या घरी जाऊन निवेदने दिली. त्यांचा पाठिंबा मिळवला. गोव्यापुरते आम्ही थांबलो नाही. पंतप्रधान ते राष्ट्रपतीपर्यंत आम्ही आमच्या रास्त मागण्या, घटनेने दिलेले अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष केला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. आम्ही कितीही प्रयत्न केले तरी सरकारला आमचं काहीच पडलेले नव्हते.
2004 साली सुरू झालेला ‘उटा संघर्ष’ 25 मे, 2011 पर्यंत एकदम अंतिम टप्प्यात पोचला. अत्यंत लोकशाही पद्धतीने सहिष्णूतेने आणि शिस्तबद्धरीत्या आम्ही आमची चळवळ पुढे नेत होते. म्हणूनच तमाम गोमंतकीय जनतेने सुद्धा आम्हांला साथ दिली. आणि आमच्या कार्याला प्रेरणा मिळाली. इकडे तिकडे छोटे मोठे मेळावे, जागृती बैठका हे सुरू असतानाच, 25 जानेवारी 2007 रोजी पणजी येथील आजाद मैदानावर गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष तथा तत्कालिन मंत्री श्री. पांडुरंग मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेला महामेळावा लक्षवेधी ठरला. उटाची 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2008 अशी नऊ दिवस काढलेली रथयात्रा मैलाचा दगड ठरली. संपूर्ण गोवा या निमित्ताने जागृत झाला. 28 जून 2009 रोजी उटाची राज्य विकास परिषद खर्या अर्थाने सार्थ ठरली. 7 डिसेंबर 2009 ते 11 डिसेंबर 2009 हे पाच दिवसांचे पणजीत सुरू केलेले धरणे आंदोलन सरकारी यंत्रणेला दम भरणारे ठरले. काहीही केलं तरी सरकार आम्हांला किंमत देत नाही. एक पानही हलत नाही तेव्हा उटाला विधानसभेवर धडक देण्याचा विचार करावा लागला.
आणि मग, 16 डिसेंबर 2009 रोजी गोव्याच्या कानाकोपर्यातून 20 ते 25 हजार अनुसूचित जमातीचे लोक राजधानीकडे जायला निघाले. पणजी बसस्टँड पुरता भरून गेला. बरोबर 11 च्या दरम्यान आम्ही मोर्चा विधानसभेवर जाण्यासाठी मांडवी पुलाकडे वळवला. मांडवीवर तेव्हा दोनच पूल होते. पुरुष महिला, युवक, युवती असे हजारांच्या संख्येने आमचे लोक जमले. आमच्या शक्तीपुढे सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा अशा सगळ्या यंत्रणा कुचकामी ठरल्या आणि कुणाला ते न जुमानता आमचे एस. टी. बांधव विधानसभेवर चाल करून गेले. सर्व चाळीसही आमदारांना आम्ही विधानसभेत कोंडून ठेवले. पूर्ण पणजी चक्का जाम झाली. काही लोकांची गैरसोय झाली, हाल झाले, पण ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले. शेवटी ट्रायबल डिपार्टमेंट आणि एस. टी. कमीशन एका महिन्यात करून देतो असे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी लिहून दिले आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेतले.
एवढं करूनही पुढे काही होईना त्यासाठी आम्ही शेवटचा निर्णायक लढा देण्याचे ठरवले. 2007 नंतर आमदार श्री. रमेश तवडकर यांची उटाचे निमंत्रक म्हणून तर श्री. गोविंद गावडे यांची सहनिमंत्रक म्हणून उटा संघटनेत नियुक्ती झाली. आमदार श्री. वासुदेव मेंग गावकर, विश्वास गावडे, श्री. दुर्गादास गावडे, या सारखे अनेक तरुण उटाच्या कार्यात झोकून देऊ लागे. उटाची शक्ती दिवसें दिवस वाढत चालली होती. सरकारी यंत्रणा ‘उटा संघर्षाला’ घाबरू लागली. उटाचा एक प्रकारचा दरारा निर्माण झाला. शेवटी 25 मे 2011 चा निर्णायक लढा आम्ही पुकारला. ज्याला ‘बाळ्ळी आंदोलन’ म्हणून सगळे ओळखतात. गोव्याचे मंत्रिमंडळ तसेच केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत आमच्या मागण्या आम्हांला पोचवायच्या होत्या म्हणूनच दोन्ही सरकारचे ‘नाक दाबून तोंड उघडायचा’ आमचा हा प्रयत्न होता.
25 मे 2011 ला बाळ्ळी येथे 20 ते 25 हजार लोक बाळ्ळी जंक्शनवर जमले. राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्ग आम्ही रोखून धरले. रस्ता बंद, रेल्वे बंद आंदोलन उग्ररूप धरणे केले. आंदोलनाची बातमी दिल्लीपर्यंत पोहचली. झोपलेल्या गोवा सरकारला दिल्लीहून फर्मान आलं. “काय चाललंय तिकडे? त्यांचे प्रश्न सोडवा.” तेव्हा गोवा सरकारला जाग आली आणि बाळ्ळी पोलीस स्टेशनला उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. बहुतांश मागण्या मान्य असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. विधानसभेत आरक्षण संध्याकाळी मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने ठरवायचं होतं. वाटाघाटी झाल्या. आम्हीसुद्धा आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिलं. आम्ही लोकांना घरी जाण्यास सांगितले. हे एवढं होईपर्यंत संध्याकाळचे चार वाजून गेले होते. जास्तीत जास्त लोक साडेचार पर्यंत आपापल्या घरी निघून गेले होते. दिवसभर शांतपणे आंदोलन झालं होतं.
पण आमचं आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून, राजकीय, प्रेरणेने काही गुंड प्रवृत्तीचे लोक दबा धरून बसले होते. जास्तीत जास्त लोक घरी गेल्यावर अशा या गुंड वृत्तीच्या लोकांनी अकस्मात जे कोणी बाळ्ळीला मागे राहिले होते, त्यांना मारहाण करण्यास सरुवात केली. ते पूर्ण तयारीनिशी दंडुके, लोखंडी सळ्या, पेट्रोल, पारय घेऊन आले होते. त्यांच्या दहशतीपुढे सगळे पळत सुटले. पत्रकारांनासुद्धा त्यांनी मारहाण केली. त्यांचे कॅमेरे काढून घेतले. काहीही पुरावा मागे राहणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. आणि या सगळ्यांत मंगेश गावकर व दिलीप काटू वेळीप या दोन युवकांना ‘आदर्श’ आणि ‘आचल’ येथे केलेल्या हत्याकांडात जिवंत जाळून मारले.
संपूर्ण गोवा शोकसागरात बुडाला होता. अनुसूचित जमात हळहळली, रडली. तेव्हा गोवा सरकारला कुठे जाग आली काही तरी करावे या दिशेने सरकारची पावले पडू लागली. ट्रायबल डिपार्टमेंटची निर्मिती झाली. कमिशन झाले,
एस. टी. कार्पोरेशन सक्षम करण्याच वचन देण्यात आले. आणि पुढे आशादायी वातावरण निर्माण झाले. 2012 ला विधानसभेची निवडणूक झाली. भाजप सरकार सत्तेवर आलं. काही मागण्या पूर्ण होताना दिसत आहेत, काही मागण्यांचे अजूनपर्यंत काहीच झालेले नाही, काही मागण्या फक्त कागदावरच आहे. विधानसभेचे आरक्षण 20 वर्षे झाली तरी मिळालेले नाही. शेड्युल एरीया घोषित झालेला नाही. सल्लागार मंडळ स्थापन झालेले नाही. वनअधिकार मिळालेला नाही. ट्रायबल सब प्लॅनचा पैसा बरोबर, पाहिजे तिथे खर्च केला जात नाही. बॅकलॉग व्हेकन्सीज भरल्या गेलेल्या नाहीत. कित्येक योजनांची बरोबर अंमलबजावणी होत नाही.
तरीपण उटाच्या 20 वर्षाच्या संघर्षाने आजच्या घडिला खूप काही मिळाले आहे. आज दहा हजाराहूनही जास्त युवक आरक्षणामुळे सरकारी नोकरीत सामील झाले. साडे तीनशेपेक्षा अधिक राजपत्रित अधिकारी झालेले आहेत. अडिचशेवर युवक आज कॉलेज-युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक झालेले आहेत. शिक्षक, क्लार्क तर आहेतच. असे प्रत्येक क्षेत्रात आमचे युवक चांगले प्रगती करत आहेत. आरक्षणामुळे कित्येक डॉक्टर्स, इंजिनिअर्स झालेले आहेत. ट्रायबल डिपार्टमेंट आणि एस. टी. कार्पोरेशनच्या जवळ जवळ 24 योजना कार्यरत आहेत. त्याचा आज प्रत्येक घटकांना फायदा झालेला आहे. पण यासाठी झगडले कोण? फक्त ‘उटा’ या गोष्टीचा कुणी विचार केला आहे का. आज 24 वर्षे आम्ही सतत संघर्ष करत आहोत म्हणून काही मिळायला लागले. आम्ही संघर्ष केलाच नसता तर हे सगळं मिळू शकलं असतं का? अर्थात उत्तर नाहीच मिळणार. कारण प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला सारून ‘उटा’ या संस्थेच्या झेेंड्याखाली एकत्र येणे हाच एक पर्याय आपल्याला आहे.
अजूनही आमचा लढा थांबलेला नाही.
श्री. प्रकाश शंकर वेळीप यांच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली उटा सदोदित आपल्या अनुसूचित जमात बांधवांसाठी कार्यरत आहे. नुकतीच उटाने ‘वाडो तिथे उटा’ हे अभियान सुरू केलं आहे.
‘उटा’चे कार्य गावांगांवात पोहचवण्याचा अभियान हाती घेतला आहे. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे. ही जमेची बाजू आहे. पण ज्या बांधवांनी सरकारी नोकर्या किंवा इतर फायदा घेतलेला आहे ते लोक पुढे येत नाहीत ही शोकांतिका आहे.
‘उटाने’ आपल्या या संघर्षात पुष्कळ त्रास भोगले आहेत. ‘उटा’च्या नेत्यांना तुरुंगात डांबले. श्री गोविंद गावडे आणि श्री. मालू वेळीप यांना 61 दिवसांची कोठडी दिली. श्री. प्रकाश शंकर वेळीप, आमदार श्री. रमेश तवडकर, आमदार श्री. वासुदेव मेंग गावकर यांनाही तुरुंगवास भोगावा लागला. महिन्याला पाच-सहा केस वेगवेगळ्या कोर्टामध्ये लढाव्या लागल्या. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा उटावर केस दर्ज झाल्या. पण मोठ्या हिमतीने उटाने सर्व केस जिंकल्या. लाखो रुपये खर्च करावे लागले. आम्ही प्रत्येकाने म्हणजे उटाच्या नेत्यांनी आपल्या खिशाला कात्री लावून खर्च भागवला. कुणाला याची कल्पना तरी आहे का? म्हणून सर्वांना हे कळले पाहिजे, त्यासाठी वाचलं पाहिजे. या संदर्भात डॉ. उदय गावकर यांचे ‘उटा संघर्ष’ उटाचा संपूर्ण इतिहास सांगणारे पुस्तक जरूर वाचावे. अनुसूचित जमातीचा धगधगता एकमेव इतिहास आहे तो ‘उटा संघर्षमय इतिहास’ हे दुसरं पुस्तक अवश्य वाचावं, ज्यात वर्तमानपत्रातल्या फक्त बातम्याच आपल्याला वाचायला मिळतील. त्या पत्रकारांनी लिहिलेल्या आहेत.
मी ‘उटा संघर्ष’ हे पुस्तक मोठ्या आनंदाने लिहिले. चारशे पानांचे हे पुस्तक जो आमचा खराखुरा इतिहास आहे. तो गोव्यातल्या तसेच बाहेरच्या लोकांना खूप आवडला. या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या हातोहात संपल्या. आता त्याची एकही प्रत माझ्याकडे उपलब्ध नाही. प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी पाच-पाच, दहा-दहा प्रती विकत घेतल्या. आज या पुस्तकावर विद्यार्थी पी. एचडी. करीत आहेत. हे पुस्तक एक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत आहेत. खरेच अभिमान वाटतोय या गोष्टीचा पण एकवेळचे आमचे सहकारी उटाचे निमंत्रक म्हणून काम केलेल्या आपल्याच माणसांनी मला पुस्तक लिहिलं म्हणून पुष्कळ त्रास दिला. वेगवेगळ्या ठिकाणी माझ्यावर तक्रारी दाखल केल्या. माझी सतावणूक करण्यात आली. शिक्षण खात्यात माझ्यावर तक्रार करण्यात आली. विधानसभेमध्ये माझं पुस्तक गाजवलं गेलं, विजीलन्सकडे माझी तक्रार देण्यात आली. मुख्य सचिवाकडेसुद्धा माझी तक्रार करण्यात आली. पण प्रत्येकाकडे मी धीटपणे लढत राहिलो आणि जिंकलोही यावरून आमचे काही नेते म्हणवणारे लोक किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताहेत याचा प्रत्यय आपल्याला आलाच असेल.
आज आमचे युवक शिकले-सवरलेले आहेत, पुष्कळ संघटना नवीन जन्माला आल्या आहेत, तुमचं कौतुक आहे. समाजकार्य कसलेही, कुणीही करावे. फक्त उटाच करणार म्हणून स्वस्थ बसू नका. आम्ही 12 मागण्या सरकारकडे मागितल्या आहेत, तुम्ही आणखी 12 मागण्या पुढे रेटा. यामध्ये कोणतीही हरकत नाही. शेवटी आमच्या अनुसूचित जमात बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा हीच मनोमन इच्छा आहे. पण सरकार दरबारी काही मागायचे आहे, मिळवायचं आहे तर ‘उटा’ सारख्या संस्थेच्या छत्राखाली एकत्र या, कुठली कामे का रखडतात ते पाहू. आपण स्वतः काही करू शकत नाही आणि दुसर्यांनी केलेलं पाहवत नाही अशी वृत्ती नको.
वास्तविक खूप लिहायचे आहे, पण शब्दांचे बंधन आहे. उटाच्या द्विदशक सोहळ्यानिमित्त सर्व अनुसूचित जमात बंधू-भगिनींना मनापासून शभेच्छा. हा सोहळा दैदिप्यमान असा होवो. आपल्या सर्वांना एकसंघ राहण्याची एक नवीन दिशा मिळो आणि सर्वाचे कल्याण होवो. एवढीच मनिषा बाळगतो आणि इथेच थांबतो.